निवृत्ती दिन आणि वाढदिवस सोहळा - येळूरगड भेट
श्री धनंजयराव आणि प्रदीप यांची निवृत्ती दिन आणि वयाची "साठी" समारंभ यानिमित्त बेळगाव येथे आपल्या नातलग यांचा स्नेहसोहळा आयोजित केला होता. त्यासाठी आम्ही शुक्रवार 7 ऑगस्ट रोजी सकाळी पुण्याहून बेळगावकडे प्रयाण केले. सकाळी साताऱ्याच्या भावाकडे नाश्ता करून हत्तर्गी येथे राम धाबा येथे जेवण करून निसर्गसौंदर्याचा आस्वाद घेत आम्ही बेळगावला चार वाजता सुखरूप पोहोचलो. प्रवासामध्ये काही ठिकाणी पावसाची साथसंगत होतीच. प्रवास सुखकर आनंदात पार पडला.
शनिवार आठ ऑगस्ट 2026 - येळूरगड भेट -
आम्ही ८ ऑगस्ट रोजी सकाळी सात वाजता येळ्ळूर गड पाहण्यास प्रयाण केले. बेळगाव पासून 15 किलोमीटर अंतरावर येळ्ळूर या गावी येल्लूरगड किल्ला हा डोंगरावर आहे. 12 व्या शतकातील रट्टा राजहंशाच्या शासकाने हा किल्ला बांधलाय. अडीच हजार फूट उंचीवर टेकडीच्या माथ्यावर हा गड आहे या गडास राजहंसगड असेही संबोधले जाते. रट्टा राजवंश, आदिलशाही सुलतान, मराठा साम्राज आणि ब्रिटिश राजवट यांची सत्ता गडावर होती. या गडावर शिवाचे मंदिर, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा आहे. गडाच्या आसपास भाताची शेती पहावयास मिळते. गडावरून आसपासची हिरवीगार शेती आणि नयन निसर्गरम्य परिसर गडावरून पाहावयास मिळतो. गडावरील स्वच्छता पाहून मनास बरे वाटले. येळ्ळूर गड आणि परिसर पाहण्याजोगा आहे गडास भेट देऊन आल्यावर सकाळी 10 वाजता पद्मश्री या हॉटेलमध्ये नाश्तामध्ये चविष्ट दाक्षिणात्य पदार्थाचा आस्वाद घेतला
०८ ऑगस्ट २०२६ - पद्मश्री हॉटेलमध्ये महाराष्ट्रीयन पद्धतीचे भोजन केल्यावर संध्यकाळी आम्ही श्रीदत्त संस्थान बाळेकुंद्री क्षेत्री प्रयाण केले. बाळेकुंद्री हे बेळगावपासून १२ किलोमीटर अंतरावर आहे. आधुनिक काळातील संत म्हणजे श्रीपंत महाराज बाळेकुंद्रीकर (१८५५ ते १९०५), त्यांचे नाव श्री दत्तात्रय रामचंद्र कुलकर्णी..लंडन मिशन स्कूलमध्ये शिक्षक.. वयाच्या २०व्या वर्षी त्यांना श्रीबालमुकूंद यांच्याकडून त्यांना अनुग्रह मिळाला. आपल्या सद्गुरुंच्या दोन वर्षाच्या स्पर्शाने श्रीपंतांचा कायापालट झाला. आपला संसार सांभाळून महाराजांनी परमार्थ केला. श्री दत्त संप्रदाय याचा प्रसार केला. श्रीपंतांनी "गीतसार" अमृतानुभव टीका, साधकांना लिहिली पत्रे, श्री दत्त प्रेमलहरी .. यासारखे अनेक ग्रंथांचे लेखन केले आहे. मंदिराच्या सभागृहात श्री पंत बाळेकुंद्री महाराजांचा सुंदर फोटो आहे. समोर पारायण, जप करण्यासाठी सभागृह आहे. मंदिराच्या परिसरात, भोजन, ऑफिस, प्राथमिक शाळा, भक्तनिवास, पुस्तकविक्री केंद्र आहेत. मागे धुनी ग्रह अजुनी सुरु आहे. ऑफिसमध्ये १५ मिनिटांची चित्रफीत टीव्ही वर दाखवण्यात येते. श्री पंत बाळेकुंद्री मंदिर आणि परिसर पाहून मनास समाधान वाटते. श्री गुरुदेव दत्त
बाळेकुंद्रीपासून जवळच असलेल्या सुळेभावी या ठिकाणी श्री महालक्ष्मी मंदिरास भेट दिली. ५०० वर्षापूर्वीचे हे मंदिर "नाणे" मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे कारण या मंदिरात खांबावर भक्तांनी जवळजवळ दोन लाख नाणी देवीबाबत कृतज्ञता म्हणून ठोकली आहेत. सुळेभावी हे पंडित कुमार गंधर्व यांचे जन्मठिकाण आहे. या गावात काही ठिकाणी हातमागाचे छोटे माग चालू आहेत. मंदिराजवळ श्री शाकंभरी देवीचे मंदिर पण आहे. हे मंदिर देवांग समाजाने स्थापन केले आहे. दोन्ही मंदिरे सुंदर आहेत.
८ ऑगस्ट २०२६ - निवृत्ती दिन आणि वाढदिवस सोहळा. -श्री धनंजयराव आणि प्रदीप या दोघांची ३१जुलै २०२६ यादिवशी कार्यालयीन निवृत्ती झाली. दोघांनी साठी पार केली. दोघांना आपल्या साथीदार यांच्यासह औक्षण करण्यात आले. वाढदिवस केक कापून साजरा झाला. डॉ. अदिती आणि सौ. श्रुती, सौ अनितावहिनी यांनी कार्यक्रमाची आणि औक्षणाची सजावट केली. सौ वर्षाने गायन सेवा देऊन आणि श्री दिवाण यांनी बासुंदी आणि भेळ आणून सोहळ्याची शान वाढवली. आपल्या उपस्थित नातेवाईकांनी श्री धनंजयराव आणि प्रदीप यांच्याबाबत कौतुक उद्गार काढले आणि गतस्मृतींना उजळत आठवणी जागवल्या. वाढदिवस आणि निवृत्तीनंतरच्या जीवनाबाबत हार्दिक शुभेच्छा दिल्या. श्री धनंजयरावांनी शिक्षण आणि नोकरी - हवाईदल देशसेवा -नंतर पोस्ट ऑफिस येथील नोकरी यांचे अनुभव सांगितले. प्रदीपने आपले कायदा शिक्षण, सांगली येथे काही वर्षे वकिली व्यवसाय, नंतर IOC नोकरीसाठी मद्रास येथील प्रथम पोस्टिंग आणि नंतरच्या बदली, ऑफिस वातावरण याबाबत थोडक्यात माहिती सांगितली. आपल्या यशाचे सारे श्रेय परमेश्वर आणि आपल्या आईवडील यांचे आशीर्वाद याना देत दोघा उत्सवमूर्तींनी आपल्या जीवन साथीदाराची साथसंगत आणि सहकार्य याबाबत स्मरण करून कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या वडिलांच्या जागी असणाऱ्या सुहासच्या मनात हा कार्यक्रम करावा असे दोन तीन महिन्यापासून होते. सुहासचा मानस - यामुळे हा सुंदर कार्यक्रम घडून आला याबाबत सर्वानी सुहासचे आभार मानले. सर्वानी हजर राहून आणि आनंदी सहभाग यासाठी सुहासने सर्वाना धन्यवाद देत मनापासून आभार मानले. कार्यक्रम उत्तम झाला.🙏

















Comments
Post a Comment