विनयाताई गाडगीळ - श्रद्धांजली

 


आज विनयाताई गाडगीळ यांना परलोकात  जाऊन 14 दिवस झाले. आज चौदावा. काय योगायोग पहा आज मराठी भाषा दिन. त्यांचे मराठी भाषेवर अत्यंत प्रेम होते. मराठी भाषा दिनानिमित्त त्या नेहमी दरवर्षी सोसायटी किंवा इतरत्र कार्यक्रम सादर करीत असत.  मराठी भाषा दिनाच्या आधी पंधरा-वीस दिवस त्या माझ्याकडे "कुसुमाग्रजांची रसयात्रा" - कविता या पुस्तकाची मागणी करून त्यावर विशेष लेखन करीत असत..  विनयाताई मराठी विषयाची  शिकवणी विना मोबदला घेत असत. मराठी निबंध आणि कविता व्याकरण आवडीने शिकवत निबंधांचे परीक्षण काम त्यांनी अनेकदा केले आहे त्यांच्या या मराठीच्या कामाबाबत त्यांचे विशेष सत्कार काही संस्थांनी केले आहेत. त्यांनी आपल्या जीवनातील आठवणी "निखळ निरंतर" या पुस्तकामध्ये लिहिलेले आहेत.या हस्तलिखित पुस्तकाचे प्रकाशन  माझ्या हस्ते  एक मार्च 2020 रोजी संपन्न झाला. वास्तविक माझी लायकी नसताना मला प्रकाशनची संधी आणि मान त्यांनी मला दिला याबाबत मी खरंच भाग्यवान... . प्रत्येकाच्या जीवनात अनेक प्रसंग, घटना घडतात त्या आठवणी व्यवस्थित स्वहस्ताक्षरात  लिहून काढणे हे सध्याच्या यांत्रिकीयुगात एक अवघड काम आहे पण त्यांनी आपल्या सुवाच्य अक्षरात या सर्व आठवणी या लेखसंग्रहात लिहून आपले मनोगत व्यक्त केले आहे.  त्या घरगुती कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका श्री व सौ गाडगीळ दोघांनी आम्हास रीतसर आमंत्रण दिले. या त्यांच्या व्यवस्थितपणाचे कौतुक करावे तितके कमीच.


सोसायटीतील श्री गणेशोत्सव आणि इतर सांस्कृतिक कार्यक्रम यांचे निवेदन या आवडीने मनापासून करीत असत. सांस्कृतिक कार्यक्रमात काही विशेष माहितीपर कार्यक्रम स्वतः लिहून सोसायटीतील मुला मुलींच्याकडून सराव करून घेऊन सादर करीत.. गणेश उत्सव समिती मधील कार्यकर्त्यांना श्रम परिहार रात्री बारानंतर चहा आणि बिस्किटे याची चहापान सेवा दर वर्षी देत. पुस्तक वाचनाचा आणि गायन, श्रवण आणि इतर व्याख्यान यांचा त्यांना छंद होता. नवीन पुस्तक वाचले नवीन कार्यक्रम ऐकला त्यावर जरूर ते  मला सांगत. पुस्तक, संगीत कार्यक्रम, व्याख्यान याबाबत आमचा नेहमी संवाद घडे.

साहित्य व्यतिरिक्त स्वयंपाकपाणी  यामध्ये त्यांना विशेष आवड होती. मन लावून त्या स्वयंपाकपाणी करीत असत. स्वयंपाकपाण्यात  त्या सुगरणच होत्या. त्यांच्या हातचे अनेक अन्नपदार्थ खाण्याचा योग आम्हास लाभला. कोविडच्या पहिल्या लाटेमध्ये विशेषता: पंधरा दिवस आम्हाला एक वेळेचे भोजन हे त्यांच्या स्वयंपाक घरातून आमच्या घरी येत होते. त्यांच्या रुचकर अन्नपदार्थ आणि पौष्टिक खाद्य यामुळे माझी तब्येत ठणठणीत बरी झाली. हे  कधीच आम्ही विसरू शकत नाही. अन्नदाता सुखी भव....


दररोज संध्याकाळी बागेमध्ये हजेरी लावून आपल्या मैत्रिणी सोबत गप्पा मारत वेळ मजेत घालवत होत्या. सोसायटीमधील आपल्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधून त्यांच्या कुटुंबीयांची, मुलामुलींची शैक्षणिक प्रगतीबाबत आस्थेने विचारपूस करीत. सोसायटीमधील लहानापासून वरिष्ठापर्यंत सर्वांशी आपुलकीने वागून सर्वांना  योग्य ते मार्गदर्शन जरूर करत असत.  कौतुका समवेत कधी काही चुकले अगर गैर झाले तर ते शाब्दिक चिमटे पण जरूर काढत. एकूण विनयाताई जणू फ्रेंड, फिलोसोफर आणि गाईड.. होत्या यात शंका नाही..


2026 चा  मराठी भाषादिन स्वर्गात साजरा करण्याबाबत देवाचे बोलावणे विनयाताई आले असावे... ईश्वरी  इच्छा यापुढे कोणाचे काही चालत नाही हेच खरे.  मराठी भाषा प्रेम, वाचन, पाककला, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, मार्गदर्शन, निरपेक्ष सेवावृत्ती, व्यवस्थितपणा, आपुलकी..या गुणाची विनयाताई यांना अखेरची आदरांजली वाहू या..आपल्या सिल्वरक्रेस्ट सोसायटी मधील सभासदांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.. ओम शांती.. श्रीराम जय राम जय जय राम.🙏 चंद्रशेखर मधुकर कुलकर्णी E302 सिल्व्हर क्रेस्ट हौसिंग सोसायटी


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा