"आजी आणि नात - सिनेमा.
नुकताच "आजी आणि नात" हा सुभाष फडके दिग्दर्शित मराठी सिनेमा पाहिला. आजीला दुरावलेले नातवंडांचे संबध आणि मुलांना घरी आजी नसणे .. या विषयावर आधारित हा सुंदर सिनेमा.. आजीची भूमिका सुलभा देशपांडे आणि नातीची भूमिका - तेजश्री वालावलकर यांनी उत्कृष्ट भूमिका केली आहे.मला आईची आई आणि वडिलांची आई या दोघा आज्यांचे प्रेम आणि आपुलकी लाभली. मी या दोघांची जमेल तेवढी सेवा केली. तसेच इतर नात्यातील आजी यांचे प्रेम पण मिळाले.
बँकेत नोकरी करत असताना लग्नाच्या पूर्वी मी वडगाव बुद्रुक येथे राहत होतो. तेथे एका आजींच्याकडे खानावळ लावली होती. आजी वयस्कर साधारण सत्तरी च्या आसपास होत्या. पण स्वयंपाक पदार्थ उत्तम बनवायच्या. कधी कधी सकाळी डबा घ्यायला गेल्यावर त्यांची तब्येत बरी नाही म्हणून डबा नाही अशा सांगत होत्या. त्यावेळी मी ऑफिसच्या मागच्या गल्लीमध्ये "स्वयंपाक घर" येथून पोळी, भाजी, आमटी भात असे पदार्थ घेऊन जात असे.. आजींना कधी कधी भाजी आणून देत असे. आजींची आर्थिक परिस्थिती बघता मी जेवणाचे खाडा याचे पैसे कापत नसे. आजींचे एकुलती एक विवाहित मुलगी पेठेमध्ये (स्थळ अर्थात..) येथे राहत होती. त्या अधून मधून मुलीकडे तीन-चार दिवसांसाठी विश्रांतीसाठी जात असत. पण त्या लगेच दुसऱ्या दिवशीच घरी परतत आणि मला निरोप पाठवत. मी त्यांना एवढ्या लवकर परतण्याबाबत चौकशी करे तेव्हा त्या सांगत.. जावई - "आई कधी जाणार" "आईला पाठव" अशी भुणभुण मुलीस करत असे आणि त्यामुळे मी माझ्या घरी परत आले.. मला चार दिवस आराम करावयास मिळत नाहीत ही खंत व्यक्त करून आपल्या पदराने डोळे पुसत. जावयाची आर्थिक परिस्थिती चांगली होती घर बऱ्यापैकी मोठे होते.. पण काय करणार.. परस्वाधीन.. हे ऐकून मलाही वाईट वाटे.. हा सिनेमा पाहिल्यावर मला त्या आजींची आठवण झाली आणि माझे डोळे पाणावले. असो आता सर्व आज्या जवळजवळ परलोकी आपल्या घरात कायमच्या गेल्या आहेत. त्यांनी दिलेले प्रेम मी कधीच विसरू शकत नाही. जिथे असाल तिथे सुखी राहा.. त्याबाबत मनापासून आदरपूर्ण नमस्कार.. त्यांच्यापर्यंत तो पोचेलच... त्यांना कितपत मी सेवा आणि वागणूक दिली याबाबत या विचार केल्यावर मन थोडे अस्वस्थ होते.
Comments
Post a Comment