नॅशनल डायट लायब्ररीस भेट
काल टोकियोमधील नागाताचो भागातील नॅशनल डायट लायब्ररीस भेट दिली. हे ग्रंथालय जपानमधले आणि जगातल्या मोठ्या ग्रंथालयापैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. जपानमध्ये पार्लमेंट हाऊसला डायट म्हणतात ही लायब्ररी पार्लमेंट च्या बाजूला आहे त्यामुळे नॅशनल डायट लायब्ररी असे नाव आहे. जपान मधली जी काही पुस्तके किंवा नियतकालिक प्रकाशित होतात त्याची एक प्रत या ग्रंथालयात ठेवली जाते. या लायब्ररीमध्ये एक कोटीच्या वर पुस्तक आहेत यामध्ये तंत्रज्ञान, विज्ञान, अध्यात्म, भाषा, सिनेमा, कला, मेडिसिन अशा अनेक विषयावर पुस्तके आहेत. 90% पुस्तके जापनीज भाषेमध्ये आहेत. या सहा मजली इमारतीमध्ये असणाऱ्या लायब्ररी काही भागातील काही पुस्तके,विश्वकोश, नॅशनल जीओग्राफिक, नकाशे पाहण्याचा आणि चाळण्याची मला संधी मिळाली. वर्तमानपत्रात - अमेरिका. फ्रान्स, ब्रिटन येथून प्रकाशित - The New York Times , Le Monde , The Times - ही वर्तमानपत्रे ५०-६० पानी आहेत. पुस्तक मांडणी, टेबल खुर्ची आसन व्यवस्था आणि इतर सोयी बघून प्रशस्त हवेशीर हॉल्स बघून मनास बरे वाटले. कॉम्प्युटर वर जवळ एका रूम मध्ये ५०- 60 लोक बसू शकतील अशी व्यवस्था होती. येथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सेवाभाव पाहून मला समाधान वाटले. सकाळी दहा वाजता मी लायब्ररीत गेलो होतो ते संध्याकाळी पाचपर्यंत वेळ कसा मजेत गेला कळले नाही.
घरी परत येताना मेट्रो मधून प्रवास करताना मला माझ्या बालपणी माझ्या गावातील लायब्ररीची आठवण झाली. चिकोडी येथे लायब्ररी होती. तेथे कानडी मराठी आणि इंग्रजी असे पुस्तके मासिके नियतकालिक, वर्तमानपत्रे वाचायला आम्ही संध्याकाळी लायब्ररी जात होतो. तेथे बसायला खुर्ची नसायची एक लांबच्या लांब बाकावर सात आठ लोक वाचण्यासाठी बसत. नियतकालिके, पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्र हे बांधून एका विशिष्ट भागात बांधून ठेवले असायचे. पंख्याचा पुरेसा वारा येत नसे. कधी कधी पंख्याचा घरघर असा आवाज यायचा. कधी कधी लाईट नसायचे त्यामुळे खिडकी जवळची जागा पकडायला धडपड असे. तेवढाच उजेड वाचायला मिळत असे. काही काही नवीन पुस्तके आले की ती वाचायसाठी नंबर लावून आम्ही बाजूलाच बसत असू. कधी कधी वर्तमानपत्रे वाचताना दोन माणसे एकत्र वाचत असताना पान आडवे तेवढे करून वाचत असू. तेव्हा दुसऱ्यास त्रास होत असे आणि त्या वेळेला आम्ही अगर दुसरा पीच पीच आवाज केल्यावर आम्ही किंवा तो पान वाचायचे सोडून दुसरीकडे जात असे. असे जरी असले तरी कधी कधी पुस्तक वाचनात आम्ही गुंग असू - कधी लायब्ररी बंद होण्याची वेळ होई आणि लाईट बंद व्हायला की आम्ही बाहेर पडत होतो. काही काही पुस्तकातील मजेशीर किंवा गंमतशीर माहिती डायरीमध्ये लिहून ठेवत असो ग्रंथालयात वेळ मजेत जात असे.. लायब्ररीमुळे काही आठवणी जाग्या झाल्या आपणाशी शेयर केल्या ..



Comments
Post a Comment