सौ नीरा मावशी
आमचे दादा पुण्याला ऑफिस कामानिमित आल्यावर आपल्या नातेवाईकाकडे वेळ काढून जरूर सर्वांना भेटत असत. पुण्याचा दौरा झाल्यावर चिकोडीला आल्यावर आम्हा मुलांना पुणे दौराबाबत सविस्तर हकीगत सांगत. CWPRS ला जाऊन निराकडे गेलो होतो. सौ निराने उत्तम स्वयंपाक केला होता. सर्वच पदार्थ उत्तम रुचकर झाले होते. सौ निरा स्वयंपाक पाणी छान करते.. असे दादा म्हणायचे. लहानपणी कळायला लागल्यावर झालेली हीच सौ नीरा मावशीची प्रथम ओळख...
आपली नोकरी, मुलांच्या शाळा परीक्षा, रजा वगैरे कारणास्तव मावशीचे चिकोडीस येणे जाणे क्वचित असे. माझी सुट्टी बेळगावला जायची त्यामुळे मी पुण्यात सुट्टीत कधीच गेलो नाही, अर्थात जाणे आणि नसले तरी सर्व मावशी आम्हास पत्रातून (पोस्टकार्ड नाहीतर इनलँड लेटर) मधून महिन्यातून एकदा भेटत असे. ऑफिस व घर काम यातून सवड काढून मावशी मुलींच्या शिक्षणाची प्रगती, अभ्यास, स्पर्धा परीक्षा, ऑफिस काम वगैरेबाबत सविस्तर हकीगत कळून आम्हा सर्व भावंडांची सविस्तर विचारपूस पत्रातून करत असे. अक्षरहीछान होते, इनलँड पत्र भरभरून ती लिहीत असे. अभ्यासाबाबत आम्हास पत्रातून मार्गदर्शन करीत असे. स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षा यांची चौकशी करून परीक्षा जरूर द्या. अवांतर ज्ञान वाढवा हीच पत्रातून तिची तळमळ असे. चिकोडी गावात शिक्षणाच्या अपुऱ्या सोयी यामुळे कधी कधी तिला आम्हा भावंडाविषयी खंत वाटायची. पुण्यात असता तर तुमचे चीज झाले असते असे ती म्हणायची..
8 सप्टेंबर 1984 रोजी कॅनरा बँकेच्या सेवेत हजर होण्यासाठी मी सर्वप्रथम पुण्यात आलो. मी व सुहास व आजी प्रथम सौ मावशीकडे उतरलो होतो. मावशीच्या आशीर्वादाने माझी पहिली नोकरी पुण्यात सुरू झाली. काही दिवस NCL quarters काकांच्याकडे मुक्काम करून आम्ही गुरुवार पेठेत भाड्याच्या खोलीत कॉट बेसिसवर राहू लागलो. पुण्यात असताना प्रत्येक रविवार हा CWPRS quarters मध्ये मावशीकडे असे. मावशी महाराष्ट्रीयन पद्धतीचे जेवण बनवत असे. जेवणात दोन कोशिंबिरी चटण्या, लोणचे, दोन भाज्या, पापड, तळण, आमटी.. कधी कधी गोड पदार्थाचा मेनू असे. कधी कधी सर्व खाद्यपदार्थ ताटात मावत नसे. सर्व पदार्थ रुची पूर्ण असत. मावशी प्रेमाने हौसेने आम्हास वाढत असे. जेवल्यानंतर आमच्या दादाने मावशीच दिलेल्या उत्तम स्वयंपाकपाण्याच्या सर्टिफिकेट बाबत नेहमी आठवण होत असे. सोमवार ते शनिवार खानावळ जेवल्यानंतर रविवारी CWPRS मावशीचे जेवण म्हणजे "घी मे शक्कर" असे. रविवार म्हणजे मला दिवाळीच वाटे ! स्त्री व स्वयंपाकपाणीबाबत भगवान रजनीश म्हणतात - खाण्याचा संबंध प्रेमाशी आहे. जीवनासाठी जेवढे भोजन आवश्यक आहे तेवढे प्रेम आवश्यक आहे. जर अगदीच यंत्रवत भोजन तयार केले गेले तर त्यात सुख मिळू शकत नाही. स्त्रीने जर स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला तर ते तिच्यासाठी अत्यंत आनंददायी असते कारण याद्वारे कुटुंबासाठी ती प्रेम प्रगट प्रगट करत असते आणि त्यामुळे घरच्या लोकांना फक्त जेवणाचे नाही तर त्याचबरोबर स्नेहाची प्राप्ती होत असते.
पाककल्याशिवाय मावशीकडे परोपकारवृत्ती कष्टाळूवृत्ती, प्रवास, लेखन, वाचन, चांगले ते दुसऱ्यांना वाटणे सांगणे व्यवस्थितपणा वगैरे वगैरे गुण आहेतच.. प्रत्येक पैलूंबाबत लिहिणे वेळेअभावी शक्य नाही.. बरेच दिवसापासून मावशीविषयी काहीतरी लिहावे असे मनात होते पण माझ्या बँकेच्या व्यस्त कामामुळे लिहिणे लांबत होते. सध्या मिळालेल्या निवांतपणामुळे हे साध्य झाले. मध्यंतरी एक सुविचार वाचण्यात आला तो असा
What you keep to yourself, you lose. What you give away, you keep forever
हे लेखन म्हणजे खाल्ल्या मिठाला जागणे हा एक प्रयत्न आहे. खरंच मावशीने खूप प्रेम दिले आणि खाद्यपदार्थ ताट भरून खाऊ घातले. त्याची परतफेड म्हणून हा वाटीभर शब्दांचा पंक्ती प्रपंच केला आहे. ती गोड मानून घेईलच. जीवनाच्या विकेटवर दोघांची शतकांची वाटचाल चालू आहे त्या दोघांना सुआरोग्य शांती समाधान लाभो आणि शतक पूर्ण हो हीच देवाकडे प्रार्थना व्यक्त करतो आणि थांबतो.. धन्यवाद
Comments
Post a Comment