निरोपसमारंभ - 7 -श्री माधव आफळे
श्री माधव आफळे
आपण रेल्वे प्रवासास घरातून निघतो. प्रवासाच्या सुरवातीस CST स्थानकावर गाडी तीन तास उशिराने सुटणार याबाबत घोषणा होते. तेव्हा आपण थोडे नाराज होतो. आणि गाडी फलाटावर लागण्याबाबत प्रतीक्षा करतो. नंतर गाडी येऊन स्थानकावर ग्रीन सिग्नल मिळतो आणि प्रवास सुरु होतो. गाडी दादर स्थानक मागे टाकून ती सायन स्थानकावर येऊन सिग्नलसाठी खोळंबून राहते. तेथे गाडी जवळजवळ तीन तास रखडते. अश्यावेळी आपल्या मनाची स्थिती काय होत असेल नाही? आपल्या मनातले वेळप्रत्रक कोलमडून पडते. अशीच अवस्था माधवरावची गेली ५-६ महिने झाली असणार. आज मात्र माधवरावांचा पुण्याकडे जाणाऱ्या गाडीस हिरवा कंदील मिळाला आहे. माधवरावांची गाडी जवळजवळ सहा महिने "सायन" स्थानकावर सिग्नलसाठी खोळंबून उभी होती. आपली सुटका होण्याबाबत माधवरावांनी प्रभूची याचना केली असणार म्हणूनच मदतीसाठी साक्षात "प्रभूच" अवतरले आहेत. शेवटी म्हणतात ना - "भगवान कि घरमे देर है ! अंधेर नाही.. "क्या प्रभूजी सच है ना ?
"फॉरीन बॉडी" - मामला माधवरावांचा - या विनोदी लेखात मी माधवरावांचे व्यक्तिचित्रण केले आहेच. मी माधवराव दर शनिवार सोमवार पुणे मुंबई गेली साडेतीन वर्ष करीत आहेत. शनिवार सोमवार आम्ही माधवरावांना चिडवत असू. शनिवार सोमवार यादिवशी माधवराव इंग्रेजीत जास्त संभाषण करत असत. तेव्हा मागून हेमंत हळूच म्हणे - "माधवराव - स्पिकिंग इंग्लिश ह" स्वारी लई खुशीत असे. प्रगती/दक्खनची राणी या गाडीतून प्रवास करताना बहुतांशी पुणेकर इंग्रेजीत संभाषण करतो. इंग्रेजीत संभाषण केल्यावर त्यांना(पुणेकरांना) स्टेट्स(अमेरिकेत) मध्ये वावरत असल्याचे एक मानसिक समाधान बहुतेक मिळत असावे. असो
माधवराव सोमवारी बहुतेक दक्खनची राणी गाडीने थेट ऑफिसला येत. आल्यावर आम्ही त्यांना गमतीने "सेकशनची राणी" आली असे म्हणत असे. ते सेकशनमध्ये सर्वांचे लाडके होते म्हणून "राणी". आपले श्री देवधरसाहेब यांचे माधवराव खूप लाडके होते. ते असताना दिवसभर "माधवराव" माधवराव हाक मारत. कधीकधी साहेबांची गाडी (लाडाने) म्हाद्या वर घसरत असे. दिवसभर साहेब माधवरावांना बऱ्याच हाक मारत. मला वाटते श्री देवधारसाहेबानी आपल्या बायकोलासुद्धा (प्रेमाने ..?) एवढ्या हाक मारल्या नसतील. एकुण काय माधवराव सेकशनमध्ये सर्वांचे "लाडके" होते. त्यांची मस्करी केलीतरी तरी ते रागावत नसत. उलट चेहऱ्यावर "प्रसन्नता" कायम असे. म्हणूनच "राणी" हे संबोधन (माधवराव रागावू नका - गैरसमज नसावा).. नाहीतरी आपली घरची राणीची चेष्टामस्करी केल्यावर आपली राणी रागावणार नाही असे छातीठोकपणे ग्वाही देणारे (महा .?) राजे आपणास भेटणे महाकठीणच. काहींच्या बाबतीत राणीच्या चेहऱ्याकडे पाहण्याचे धाडस राजे करू शकत नाहीत. "प्रसन्नता वगैरे बातच नको.मी, देवधरसाहेब, सतीश शेणॉयमी परिसर विभागातील मदन .. वगैरे माधवरावांना नेहमी चिडवत असू. आम्ही सर्वजण त्यांना चेष्टेची गुगली सदैव टाकत असे पण माधवराव वेस्ट इंडिज संघाच्या रॉय फ्रेड्रिक्स या फलंदाजाप्रमाणे चिवट फलंदाजी करून कधीच आपला त्रिफळा उडू देत नसत. त्यावेळी त्यांचा शांतपणा हसतमुख चेहरा वगैरे पाहून आम्हास एकच चेंडू टाकल्यावर पुढचे षटक अर्धवट सोडावे लागे.
सतीश शेणॉय च्या शेजारी बसून माधवरावांनी "Association " च्या कामात बराच रस घेतला होता. सभासदांबरोबर जनसंपर्क वाढविला होता. इतर नव्या कर्मचाऱ्याची ओळख स्वतःहून करून घेत. विशेष म्हणजे ओळख झालेली व्यक्तीसुद्धा नंतर आपणहून माधवरावाबरोबर बोलत असे. नाहीतर आपल्याबाबतीत एकदा ओळख झालेली व्यक्ती दुसऱ्या खेपेस स्वतःहून संवाद करेल याची शाश्वती नाही. असो. मध्यंतरी "Association बाबतीत सतीशच्या पावलावर पाऊल टाकून नेतेपदाच्या स्वप्नाचा किल्ला सर करून तिथे विराजमान होण्याचा डाव माधवरावांनी टाकला होता. पण किल्ला सर होण्याआधीच देवधारसाहेबानी त्याच्या गडास सुरुंग लावला होता. माधवरावांचे नेतेपदाचे स्वप्न धुळीस मिळाले. ते जरी नाराज झाले तरी त्यांनी देवधारसाहेबांच्या शब्दास मान दिला होता. देवधारसाहेबानी जो मोलाचा सल्ला माधवरावांना दिला त्याला तोड नाही. स्पष्टवक्तेपणाने परखड सल्ला देणारी माणसे आजकाल खूपच दुर्मिळ झाली आहेत नाही का ..? यालाच खरं प्रेम म्हणतात. तरीपण माधवराव नाराज न होता साहेबांचा उपदेश मनावर घेऊन वाटचाल करा.. भविष्यात तुमच्या गडाचा पाया मजबूत होणार यात शंका नाही.
Association साठी HO circular च्या माहितीच्या कॅसेट माधवरावांनी काढून मोलाची कामगिरी केली आहे. त्यांचा मधुर आवाज बऱ्याच जणांच्या दारी नव्हेतर स्वयंपाकघरापर्यंत पोचला आहे. परीक्षेवेळी महिला कर्मचारी स्वयंपाक करताना कॅसेट ऐकत म्हणून स्वयंपाक घरापर्यंत म्हणतो. Association नी आयोजित केलेले प्रमोशन बाबत मार्गदर्शनपर कलासवेळी माधवरावांनी सहभाग घेऊन मार्गदर्शन निरपेक्ष बुद्धीने केले आहे. त्यांच्या मनाच्या मोठेपणाचे कौतुक करावे तितके कमीच..
त्यांचा सर्व सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग अग्रक्रमाचा असे. हिंदी दिवस, ऑफिस श्री सत्यनारायण पूजा, स्टडी circle , ब्रेन स्टोर्मिंग मिटींग्स, सेकशन सेंड ऑफ .. वगैरे . त्याच्यामुळे कार्यक्रमाची शोभा वाढत असे. नवरात्रीतील ऑफिसमधील हळदीकुंकू कार्यरं कधी, कार्यक्रमावेळी लुटण्यासाठी वस्तू वगैरेची बित्तमबातमी माधवरावांना सर्वप्रथम कळे. एकवेळ सेकशनमधील महिला कर्मचाऱ्यांना कल्पना नसे. मात्र हळदीकुंकू कार्यक्रमावेळी त्यांचा सहभाग नसायचा ह ! भाग घेतला असत तर माधवरावांनी मजेशीर उखाणा घेतला असता आणि महिला मंडळाचे नक्कीच मनोरंजन केले असते. यात शंका नाही.. माधवराव हा माझा शालजोडीतला.. असे कृपया समजू नका ह.. पण तुमच्या "रसिक मनाच्या साडीचा एक सुंदर पदर आहे.
त्यांच्या अंगी इतर कलागुण आहेतच .. नाट्य वाचन संगीत योग ध्यानधारणा, कार्यक्रमातील सहभाग .. वगैरे .. या सर्व कलाकुसरीने सजलेली कर्नाटकी कशिद्याची शाब्दिक शाल मी माधवरावांना अर्पण करत आहे. या शालीची उब त्यांना त्यांच्या जीवनाच्या प्रवासात सदैव मिळो.. शालीवरच्या विणकामाची वीण घट्ट राहून विणकामात भर पडो! हीच प्रार्थना व्यक्त करतो. मित्रानो दर सोमवारी माधवरावांची आठवण झाल्याशिवाय दिवस जाणार नाही यात शंका नाही. आता मात्र खरंच सुटा.. थांबू नका.. घरी तुमच्या राणीसाहेब वाट पाहत असतील.. नव्या वर्षानिमित्य आपले जीवन सुखासमाधानाचे, आरोग्यमयी भरभराटीचे राहो हीच सदिच्छा .. गुड बाय .. धन्यवाद
29.12.2001
Comments
Post a Comment