निरोपसमारंभ - 1 श्री एस बी कल्लेसाहेब
श्री एस बी कल्लेसाहेब निरोपसमारंभ
आज आपण श्री कल्लेसाहेब यांच्या निवृत्तीसंबंधी निरोप देत आहोत. कल्लेसाहेब निवृत्त होतायत यावर आपला विश्वास बसत नाही. त्यांच्या तब्येतीकडे (विशेषतः काळे केस) बघता साहेबाची खरोखरी साठी कधी गाठली? असा प्रश्न मनास पडतो. असो प्रथम निवृत्तीनिमित्य हार्दिक शुभेच्छा .. त्यांना साठाव्या वर्षी लाभलेली तब्येतीची साथ शंभराव्या वर्षीपण अशीच मिळो हीच प्रार्थना.
त्यांचा ऑफिसमध्ये advances Dept मध्ये बराच कालावधी गेला. मी Advances Dept काम करताना माझा त्यांचा जास्त संबंधामुळे स्वभावाची ओळख होऊन दोघांच्यात जवळीक निर्माण झाली होती. त्यांचा स्पष्टवक्तेपणा, वास्तववादी दृष्टिकोन, इतरांना मतप्रदर्शनाचे स्वातंत्र, मोकळी चर्चा करून स्वतःचे मत पटवून देणे, उगाच दुसऱ्याची वारेमाप स्तुती न करणे वगैरे गुणांचे दर्शन घडले. याचबरोबर विरोधी मतप्रदर्शन करण्याबाबत ते कधीच मागे नसत. या त्यांच्या विरोधी भूमिकेमुळे मला नेहमी वाटे की जर "मॉक पार्लिमेंट" प्रयोग केला तर ते "विरोधी पक्षनेता" भूमिका चांगली वठवू शकतील. कोणताही पक्ष सत्तेवर येवो विरोधी पक्षनेत्यांची खुर्ची त्यांनी सोडली नसती. असो हे गंमत म्हणून सांगतो ह. बऱ्याचवेळा आम्ही त्यांना मुद्दाम चर्चेत/गप्पात चिडवत असू, पण एकदाही ते चिडले/रागावले नाहीत. यावरून त्यांचा मनावरील संयमाचे कौतुक करावे तितके कमीच. कित्येकदा बोलताना/चिडवताना कधी कधी सौ. मीना फडके मला म्हणत - सी एम - तुमचे वय काय आणि त्यांचे वय काय? तुम्हाला हे शोभते का? मित्र हो - माझ्यापेक्षा ते वयाने जवळजवळ दुप्पट असले तरी खेळीमेळीच्या वातावरणात आम्हाला याची जाणीव नसे. मला कधीच यात गैर वाटले नाही. वैचारिक पातळी एकदा जुळली की माणसातील वयाचे अंतर नेहमीच गौण राहते. अश्यावेळी सुसंवाद घडून नेहमी विचाराची देवाणघेवाण होते. असे माझे स्पष्ट मत आहे. असो.
आपल्या सर्वाना माहित आहे की ते शारिरीक रोगावर स्वतःजवळचे औषध देऊन रोग बरा करत. मित्र हो - ते नुसतं शारिरीक रोगावरच नव्हे तर मानसिक रोगावरपण इलाज करत. कारण कधीकधी मी टायपिंग कामामुळे कामाचा कंटाळा वाटतो अशी तक्रार करीत असे. त्यावर ते १५-२० मिनटे उपदेशाचा डोस पाजत आणि कंटाळा पळून जात असे. तेवढेच मनाला बरं वाटे. त्यांच्यातील विविध असामान्य गुणदर्शनामुळे मला नेहमी आपण एक थोर संत महात्माच्या सानिध्यात वावरत असल्याचा भास होई. त्यांच्या या संतमयी सहवासाच्या लाभाचा वाटा मला अमाप मिळाला आहे. त्यांच्या अभिमान वाटतो आणि याबाबत मी स्वतः भाग्यवान समजतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे - He is Friend, philosopher and guide. He is also nice “Care-Taker”
कोणत्याही व्यक्तीचा (अर्थात लायक) पाहुणचार साहेब खूप मनापासून आग्रहाने करीत. पाहुणचाराबाबत मला प्रत्यय आला आहे. त्याचे असे झाले. एकदा ऑफिस सुटल्यावर आम्ही काही विषयावर गप्पा मारीत होतो. नंतर ऑफिस बंद करून बाहेर पडलो तर मुसळधार पाऊस पडत होता. तेव्हा साहेबानी मला त्यांच्या घरी त्यांच्या कारमधून येण्याबाबत आग्रह केला. मी होकार दिला. त्यांच्या कारपर्यंतचे अंतर कापताना पावसात साहेबानी त्यांची स्वतःची छोटीशी छत्री उघडून डोक्यावर धरली. चालताना पावसात मी जास्त भिजू नये याचीच काळजी साहेब जास्त घेत होते. त्यादिवशी त्यांच्याकडे मुक्काम घडला. मुक्कामात मला त्यांच्याकडे टीव्ही वर प्रथम "आंधी" सारखा सुंदर चित्रपट पाहण्याचा योग आला. त्यांच्या वयस्कर मातोश्रीनी चवदार स्वयंपाक बनवला होता. मनास बरे वाटले. मित्र हो - रात्री पाऊस थांबला होता. पण मी मात्र साहेबांचे आदरतिथ्य, चित्रपट/गप्पा यामुळे पार चिंब भिजून गेलो होतो.
त्यांच्या पाहुणचाराबाबत खूप काही लिहिता/बोलता येण्यासारखे आहे. याबाबत मी अधिक बोलून आपण सर्वाना चिंब भिजवू शकलो असतो पण सध्या आपण सर्वजण विरहमयी दुःखात आहात त्यामुळे मी त्या आठवणींच्या सरींना रोखून धरतो. वास्तवीक त्यांनी दिलेल्या मानाबाबत आणि मनापासून केलेल्या पाहुणचाराबाबत मी खरंच पात्र होतो का? असं एक मन म्हणत होते. तर दुसरे मन म्हणत होते की - तू असे काय पुण्य केलेस आणि पाहुणचाराचा मानकरी झालास. या सर्वातून त्यांनी care taker ची भूमिका उत्कृष्ट वठवली. खरं पाहता मी त्यांचा कोण होतो हो? कोणीच नव्हतो. फक्त ऑफिसमधील सहकारी कर्मचारी मित्र असच नातं होतं. पण त्यांनी माझ्या पाठीशी राहून स्नेहरुपी छत धरून उन्हाळे पावसाळ्यात प्रेमळ आसरा दिला आहे. असा आसरा माझ्या इतर सहकारी मित्रानापण मिळाला असेलच यात शंका नाही.. मित्र हो - यापुढे पावसावेळी - बाहेर मुसळधार पाऊस असेल पण ऑफिसमध्ये कल्लेसाहेब नसणार याची खंत वाटते. मला मात्र त्याप्रसंगी कल्लेसाहेबांची आठवण होणार यात शंका नाहीच.. त्यांचे निवृत्तिपर जीवन/आयुष्य सुखासमाधानाचे तसेच सदैव्य आनंदमयी राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.. या प्रसंगी मी त्यांना एक छोटीशी भेट देत आहे. या बॉक्समध्ये नुसती मिठाई नसून त्याचसमवेत त्यांच्या सहवासातील गोड आठवणीपण आहेत. याच भावनेतून त्यांना अर्पण करीत आहे. ते गोड मानून याचा स्वीकार ते करतीलच. All the Best in Life .. धन्यवाद - सी एम - ३१.१०.१९९४
Comments
Post a Comment