"सहज सुचलं म्हणून" - बहिणाबाई चौधरी - पुणे आकाशवाणी केंद्रावर वनिता मंडळ कार्यक्रम
10 july - पुणे आकाशवाणी केंद्रावर वनिता मंडळ कार्यक्रम अंतर्गत "सहज सुचलं म्हणून" या सदरात - बहिणाबाई चौधरी यांच्याबाबत कार्यक्रम ऐकला. शालेय जीवनात बहिणाबाई कश्या भेटल्या - त्यांचे जीवन संघर्ष, कष्टमय आयुष्य, संकटातसुद्धा कविता कशी सुचली याबाबत माहिती थोडक्यात सांगितली. संसाराची गाणी, माणूसपणाची कविता, जीवनग्रंथातील तत्वज्ञान, त्यांच्या कवितेतून आखा जीवनपट उभा राहतो.
अरे संसार संसार ...जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके तवा मिळते भाकर...हे गाणे ऐकत असताना माझे मन पन्नास वर्षांपूर्वीचे माझे बालपणात - आमच्या स्वयंपाकघरात गेले. चुलीवर माझी आई भाकरी करत असताना चे दृश्य माझ्या डोळ्यासमोर आले. आटोपशीर स्वयंपाक घरात दोन चुली होत्या, एक खिडकी थोडी उंचावर या खोलीलगत परसू होते. येथे आई भाकरी करीत असताना आम्ही सात भावंडे आणि आजी/दादा असे ऐकून आम्ही ८ जण भोजनास बसत होतो. प्रत्येकास नंबरनुसार भाकरी पानात पडत असे. उन्हाळ्यात वाऱ्याची झुळूक साठी आपली जागा खिडकी/प्रवेशद्वार जवळ मिळण्यासाठी आम्हा भावंडात स्पर्धा असे. पावसाळ्यात अगर थंडीदिवसात सगळे चुलीजवळ जागा पटवण्यासाठी चढाओढ असे. भाकरी पानात पडायला विलंबामुळे आमची थोडीफार चिडचिड आणि आईवर रागावत असू. गर्मीच्या दिवसात घामाने निथळत .. पावसाळ्यात लाकडे लवकर पेटत नसत.. फुंकून फुंकून थोडा धूर होत असे..भाकरी भाजताना कधी कधी हाताला चटके बसत.. स्वयंपाकघरातील वातावरण कसे असले तरी आई मात्र जवळजवळ १५ ते २० भाकऱ्या बनवत असे..काही भाकरी जास्त करपली तर ती आपल्यासाठी ठेवून घेत. आईच्या भाकरीची चव काही आगळीच असायची.. अर्थात प्रत्येक लेकरास आपल्या माऊलीची भाकरी प्रिय असतेच... आईला दिलेला त्रास, आमची उगाच चिडचिड.. हे गाणे ऐकताना जणू माझ्या मनास आठवणींचे चटके बसतात.. आठवणींचा धूर जाऊन कृतज्ञताचे अश्रु डोळ्यात जमा झाले. आपले मन.. असो शेवटी बहिणाबाई म्हणतात मन वढाय वढाय.
खोप्यामंदी खोपा, मन, जगणं मरण.. ही कविता तर मनास भावून जाते...इतर निसर्ग कविता, माहेर सासर विषयी कविता ..जीवन कसे जगावे हे शिकवतात... गुरुपुर्णिमानिमित्य पुणे आकाशवाणी केंद्रांनी एक श्रवणीय कार्यक्रम सादर केला त्याबाबत धन्यवाद.. मनास आनंद झाला. आपली माउली आणि थोर बहिणाबाई .. या गुरूंचे साक्षात दर्शन घडले असेल काय..? असो गुरुपुर्णिमानिमित्य मनापासून सर्व गुरूंना साष्टांग नमस्कार...विनम्र अभिवादन...
Comments
Post a Comment