चिकोडी येथे श्री दत्त मंदिर येथे महापूजा आणि पालखी

 



२१ जून २०२५ - चिकोडी येथे श्री दत्त मंदिर येथे महापूजा आणि पालखी कार्यक्रमासाठी आम्ही साताऱ्याहून गाडीने चिकोडीस प्रयाण केले.  पोचल्यावर नेहमीप्रमाणे  महादेव मंदिर, श्री शाकंभरी मंदिर, श्री मारुतीमंदिर आणि व्यंकेटेशमंदिरास भेटी दिल्या.  दुपारी श्री मंदिर मंदिरात आरती आणि प्रसाद याचा लाभ घेतला. दत्ताची पूजा सजावट सुरेख झाली होती.  संध्याकाळी आम्ही तोरणहल्ली या गावी श्री हनुमान मंदिरास भेट दिली. चिकोडीपासून हे १० किलोमीटर अंतरावर संकेश्वर रोड वर आहे. हे हनुमानाचे १२ व्या शतकातील स्वयंभू मंदिर आहे. मंदिराचा आवार मोठा आहे मुख्य मंदिरात काचेचे नक्षीकाम सुंदर केले आहे. आजूबाजूस भक्तांना राहण्यासाठी खोल्या आहेत.  अजुनी मंदिराचे काही बांधकाम सुरु आहे.  या मंदिरात मोठ्या चामड्याच्या चपला आहेत. रात्रीच्यावेळी मारुती या चपला घालून गावातून फेरफटका मारतो आणि चपलांचा करकर आवाज जाणवतो असे गावकरी सांगतात.  परत येथे काही लहान चपला पण आहेत. त्या चपला आपल्या दुखऱ्या भागावर मारल्यावर दुखणे कमी होते त्यामुळे बरेच भक्त हळुवारपणे मारून घेत होते.  माझ्या सौ. ने चपलांची माझ्या डोक्यावर चापटी मारली (नवऱ्याचे डोके शांत राहू... आणखीन काय ..?) काही पुरुषपण बायकांना डोक्यावर चपलानी चापटी देत असताना पाहिले.  असो मंदिर आणि परिसर रमणीय आहे. आम्ही बालपणी हनुमान जयंती वेळी चालत अगर काहीवेळा सायकलने मारुतीस भेट देत होतो.  आजचा मंदिर कायापालट - बांधकाम सुंदर आणि पाहण्याजोगे आहे. तोरणहल्ली पाहून मनास आनंद झाला.


चिकोडी महावीर नगर भागातील नवीन बांधलेले श्री गजानन महाराज मंदिरास भेट दिली. या मंदिराचे बांधकाम उत्तम झाले आहे. आम्ही गेलो तेव्हा मंदिर बंद होते. मुख्य दरवाज्यातून श्री महाराजांचे दर्शन घेतले. मूर्ती सुंदर आहे.  मंदिराच्या काही भागात अध्यात्म आणि विज्ञान याबाबत काही फलक लावले आहेत. मंदिराच्या शेजारी असण्याऱ्या बंगल्यातील वयस्कर व्यक्तीचे देहावसान झाले होते. त्यामुळे बरीच गर्दी आणि दुखवटा होता. अंत्यविधीसाठी सरकारने गाडीची सोय आणि गाडीत संगीत, फुलांच्या माळासजावट  केली होती. हे पाहून बरे वाटले. असो. अंत्यविधी दर्शन पाहून ... "मरणाचे स्मरण असू दे ".. असे श्री गजानन महाराज म्हणाले असतील नाही का.. ? गण गण गणात बोते..


रात्री श्री दत्त मंदिरात पालखी सोहळा छान पार पडला. सौ. वर्ष आणि  मयूर यांनी पालखींवेळी गायन सेवा केली.  दत्तभक्त मयूर आणि छोटू यांनी सोवळे नेसून पालखींवेळी प्रत्यक्ष प्रदक्षिणा समयी विशेष सेवा दिली. चिकोडी ट्रिप करून आम्ही रात्री एक वाजता सातारा येथे सुखरूप येऊन पोचलो.  २१ जून हा योग दिन.. यादिवशी चिकोडी येथील मंदिरे,  श्री दत्त पालखी, तोरणहल्ली मारुती भेट देण्याचा उत्तम योग आला.. हा एक योगायोग..


Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा