कावासाकी प्लाझा येथे "जपम" कार्यक्रम
१८.१०.२०२५ - कावासाकी प्लाझा येथे "जपम" कार्यक्रम आयोजित केला होता. याठिकाणी जपानमधील सारे भारतीय एकत्र येऊन श्री विष्णू सहस्त्रनाम पठण करतात. श्रेयस आधीपासून जात होता. हे ठिकाण श्रेयसच्या घरापासून साधारण दोन किलोमीटर वर आहे. आम्ही संध्याकाळी चार वाजता कार्यक्रम स्थळी पोचलो. गणपती, श्री व्यंकोबा, लक्ष्मी यांची पूजा झाल्यावर श्री विष्णू सहस्त्रनाम सामूहिक पठण झाले. यानंतर भक्तांनी गायनसेवा सुरु केली. एकानी तामीळमधून कथा सांगितली. मला सारे डोक्यावरून गेले. कथा सुंदर २० मिनिटे कथन केली. काही स्रोते पठण केली गेली शेवटी आरती झाली आरतीनंतर सारी भक्तांनी कुटुंबासह फुले अर्पण करून नमस्कार केला. ऑक्टोबरमध्ये ज्या भक्तांचे वाढदिवस असतात त्यांना शुभेच्छा दिल्या. काही धार्मिक घटना अगर कार्यक्रमाबाबत सूचना दिल्या. महाप्रसाद मध्ये पुलिवोग्रे(भाताचा प्रकार), दहीभात, वेफर्स, बटाटा भाजी, चुन्दल, रवा लाडू, खानतोली, खजूर वडी, बासुंदी... असा मेनू होता. सारे पदार्थ चविष्ट झाले होते. राहिलेले अन्न पदार्थ जे एकटे राहतात त्यांना दिला जातो. जपानमधील वेगवेगळ्या भागातून (पन्नास साठ किलोमीटर) अंतरावरून चाळीस भक्तगणांनी हजेरी लावली. मनास आनंद आणि समाधान वाटले. या कार्यक्रमाचे मुख्य श्री मुरली यांनी २८ वर्षांपासून हा उपक्रम दर महिना सुरु असल्याचे सांगितले. श्री मुरली यांचे सगळ्या भक्तांना प्रसाद मिळाला ना .. सर्वांची विचारपूस आणि काळजी घेत होते. हजारो मैल घरापासून दूर असणाऱ्यांना एक कौटुंबिक वातावरण मिळावे हा उद्देश असे श्री मुरली यांनी सांगितले. काही नवीन भक्त आणि नातेवाईक मंडळींनी हे आपले जपानमधील दुसरे घरच अशी कबुली दिली. आम्ही प्रत्यक्ष याचा अनुभव घेतला.८ वाजता हॉल रिकामा करायचा होता. साऱ्या भक्तांनी कार्यक्रमानंतर सारी आवराआवरी, स्वच्छता, टेबलखुर्च्या व्यवस्थित लावल्या. जपानमध्ये कार्यक्रम आधी जशा हॉल असतो तसा परत करून द्यावयाचा असतो.जपम साठी सौ वर्षाने खानतोली वडी प्रसाद आणि गायन सेवा यांचे योगदान दिले.
श्री मुरली यांच्या काम पाहून मला ३५ वर्षांपूर्वी बँकेत काम करीत असताना माझा तामिळ साथीदार सहकारी रामप्रसाद याची आठवण झाली. तो अत्यंत धार्मिक आणि ऑफिसमधील कार्यक्रमात आनंदाने सहभाग घेऊन सारी तयारी आणि कष्ट घेऊन साऱ्यांना सामावून निरपेक्षबुद्धीने भक्तीने कार्यक्रम पार पडत होता. उत्तम प्रसाद वाटप याकडे लक्ष .. सर्वांसी मिळून मिसळून - सर्वांची काळजी घेत असे. काय योगायोग नाव - रामप्रसाद - राम आणि प्रसाद...असो गत स्मृतींना उजाळा..ओम विष्णवे नमः 🙏 श्री राम जय राम जय जय राम...
Comments
Post a Comment