जपान प्रयाण

 






प्रिय श्रेयस,


आज तू जपान देशात नोकरीनिमित्त दिल्ली मार्गे टोकियो शहराकडे प्रयाण करीत आहेस.  तुझ्या उच्च शिक्षणानंतर तुला जपान येथे पहिली नोकरी लागावी अशी माझी मनस्वी इच्छा होती. तुझे IIT कानपुर येथे शिक्षण पार पडून तुला टोकियो येथे नोकरी लागणे ही सारी आपल्या कुलदेवतेची कृपा, पूर्वपुण्याई, सर्व थोरामोठ्या नातलग मंडळींचे आशीर्वाद आणि सदिच्छा.. शिक्षण आणि नोकरी यात तू तुझ्या स्वकष्टाने यश मिळावे आहेस याचा आम्हास अभिमान आणि कौतुक आहे. 

नवीन नोकरी ठिकाणी मन लावून प्रामाणिकपणे कष्ट कर आणि बढती होऊन प्रगती होऊ दे. जपान देश तंत्रज्ञान विषयात प्रगतशील आहे. नवनवीन तंत्रज्ञान शिकून घे. नोकरी आणि ज्ञानात प्रगती घडून आपल्या देशाचे नाव उज्ज्वल कर. जपान येथील मुक्कामामध्ये तेथील कायदे कानून याचा अभ्यास, ओळख करून नियमाचे काटेकोर पालन कर.

तू काय कर आणि कसे वागावे याबाबत मी काही जास्त उपदेशाचे डोस पाजणार नाही. तू अनुभवी आणि हुशार आहेसच.  जमेल तसे संपूर्ण जपान देश पाहून घे. निसर्ग सौंदर्याचा आनंद घे. निसर्गाशी मैत्री कर. कधीही स्पर्धा करू नकोस. निसर्गाचा सन्मान कर. संस्कृती आणि माणसे यांचा अभ्यास कर आणि जे चांगले ते आचरणात आणण्याचा प्रयत्न कर.   

Be a human being . माणूस किती शिकला आणि संपत्तिवान झाला तरी माणुसकी महत्वाची. माणसाने विज्ञानात इतकी प्रगती केली की तो आकाशात पक्षापेक्षा उंच गेला, समुद्रात माशापेक्षा खोल गेला, पण माणसाला माणसासारखे जमिनीवर चालता येत नाही. असे प्रा. शिवाजीराव भोसले म्हणत.  नेहमी तुझे पाय जमिनीवर राहू दे.

आपल्याला जे जे काही देवाने दिले आहे त्याबाबत कृतज्ञता बाळग आणि दिवसातील किमान एक तास तर भगवंताचे चिंतन,मनन,भक्ती,ध्यान, पठण.. जरूर कर. नेहमी आपली तब्येत सांभाळून वर्तमानात जगण्याचा प्रयत्न राहू दे.  शेवटी आपली काळजी देव घेतोच यात शंका नाही.

सर्वात शेवटचे पण महत्वाचे - तुझे बालसंगोपन, नर्सरी ते उच्चं शिक्षण, आणि नोकरीनिमित्य विमानात पाऊल ठेवणे पर्यंत मदत आणि सेवा या बाबत सौ. वर्षाचा सिंहाचा वाटा आहे. तिने केलेला त्याग, कष्ट, सेवा याचे स्मरण तुला कायम हवे.  जगाच्या पाठीवर कोठेही असलातरी तुझ्या "माउलीचे" हे ऋण तुझ्याबरोबर कायम राहू दे.   सौ. वर्षाचे कौतुक करावे तेवढे कमीच..हे मी जवळून अनुभवले आहे. याचा मला नेहमी अभिमान आणि कौतुक वाटते. तुझे भावी जीवन सुखसमाधान, आरोग्यदायी, आनंदमयी आणि भरभराटीचे राहो .. हीच श्री शाकंभरी देवीस मनोभावे प्रार्थना आपल्या साऱ्या नातलगांकडून ...शुभम भवतु...


शेखर 

21.12.2023








Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा