काका घाटपांडे एक पहाडी व्यक्तिमत्व
माझी मोठी बहीण सुलभा लग्नानंतर श्री घाटपांडे यांच्या घरी गेली. श्री घाटपांडे यांचा नारायणपेठ माती गणपतीजवळ मोठा वाडा. लग्नानंतर काही दिवस मुंबईस घाटकोपर येथे होती. ती जेव्हा पुण्यास येई तेव्हा मी नारायणपेठेत तीला भेटायला जात असे. तिचे सासरेबुवा हे नेहमी हॉलमधील कोचावर बसलेले असत. ते घाटपांडे कुटुंबाचे कर्ता आणि सर्वेसर्वा होते. थोडे कडक व्यक्तिमत्व. अर्थात पूर्वीची माणसे कडक करारी असत. त्यांच्या स्वभावामुळे काहीजण त्यांच्याशी बोलावयास घाबरत. त्यांना सर्वजण काका म्हणत. प्रथम जुजुबी ओळख झाली. बँकेत असताना माझी लक्ष्मीरोड गोखले हॉल नजीक ऑफिसमध्ये बदली झाली. आणि मी घाटपांडे वाड्यानजीक आलो. त्यावेळी माझे लग्न झाले नव्हते. तेव्हा बहिणीच्या आग्रहाखातर मी कधीकधी बहिणीकडे दुपारी जेवण संध्यकाळी चहासाठी जात होतो. घरगुती समारंभ आणि सणास हजेरी असायची. हळूहळू राजकारण क्रिकेट खेळ वैगैरे गप्पा मारीत मारीत आमचे काकांशी सूत जमले. राजकारणावर आमच्या गप्पा होत. त्यावेळी वर्तमानपत्र वाचन श्री व्ही. पी सिंग यांचे मंडल कमिशन राजकारण विषय खूपच गाजला होता. त्यावेळी इंडियन एक्सप्रेस वर्तपणपत्रात श्री अरुण शौरी यांचे मंडल राजकारणविरोधी लेख प्रसिद्ध होत असत. काका आधी वाचून तो पेपर माझ्या वाचण्यासाठी बाजूला काढून ठेवत असत. माझे ऑफिस सुटल्यावर संध्याकाळी काका साडे पाच वाजता माझी वाट चातकाप्रमाणे पाहत असत.
गेल्यावर पेपर मला देऊन हे वाच असे सांगत मग आमच्या गप्पा होत. हॉलमधून शेखर आला आहे चहासाठी फर्मान देत. गप्पा संपल्यावर आणि जायची वेळ झाली तरी चहा आला नाही म्हटल्यावर ते आजी आणि पुष्पाताई यांच्यावर चहा का केला नाही म्हणून बोलत मला कधीकधी वाईट वाटे. मग परत चहा ठेवल्यावर परत तेव्हढ्याच अर्धा तास गप्पा. काकांना बरे वाटे. रोज ऑफिस सुटल्यावर आमच्याकडे चहागप्पासाठी यायचे असे काकांचे मला आग्रहाचे सांगणे असे. काकांबरोबर मी गप्पा मारतो म्हटल्यावर आजींना कौतुक वाटे. माझ्यासाठी भजीचे पीठ तयार ठेवून चहाबरोबर गरमागरम भजी मला प्रेमाने करून देत. कधीकधी रामाच्या देवळात भजनासाठी जात असताना मला देवळात जाते आणि मी आल्यावर चहा करून देते मगच घरी जा असे मला सांगत. काकांच्या विचारसरणी यामुळे त्यांना वावगे काही खपत नसे. लगेच राग व्यक्त करीत. काँग्रेस पार्टीतील काही व्यक्तीवर कडकडून टीका करीत असत. त्यावेळी मंत्रिमंडळातील एक भाजपच्या मंत्र्याने एक उद्योगपतीस सरकारी सूट दिली होती याबाबत पेपरमध्ये बराच गाजावाजा झाला होता तेहवा मी काकांना डिवचण्याचा हा मुद्दा सांगत. तेव्हा ते त्या मंत्र्यांशी भरभरून शिव्यांची लाखोली वाहत. काय शेण खालले असे रागावून म्हणत. तेव्हा मी म्हणे अहो जाऊ द्या शेवटी राजकारण आहे. काँग्रेस काय भाजप काय .. भाजप म्हटल्यावर त्यांच्या मनाला लागले होते. पूर्वीच्या माणसाचे राग आणि आपुलकी जिव्हाळा हे दोन्ही अफाटच असायचे.
काका दररोज नियमित साग्रसंगीत पूजा आणि रुद्र मंत्रपठण करीत. मला रुद्र मंत्र कसा म्हणायचा यं, रं, लं.. मला म्हणून दाखवत. त्याचा फायदा काय सांगत. त्यावेळी हे सर्व माझ्या डोक्यावरून जाई (कारण मी त्यावेळी साधी संध्या पण करीत नव्हतो). काकांनी नोकरी,संसार मुलांची लग्ने - संसार रहाटगाडा .. याबाबत मला सांगितले. ते नोकरीस सायकलवरून खडकीला जात असत. पानशेत धरण फुटल्यावर पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होते.. याबाबत मला सांगिंतले. काकांचे कर्तृत्व, काबाडकष्ट, जिद्द हे सर्व पाहून काका - पहाडी व्यक्तीमत्व.. मी त्यांच्या पासंगाला पण नाही.
माझ्या वडगावबुद्रुक येथील फ्लॅटच्या वास्तुशांतीस ते हजर होते. वयोमानामुळे ते कधीच कोणाकडे जात नसत पण माझ्या वास्तुशांतीस मात्र ते सह आले होते. फ्लॅट खालच्या मजल्यावर होता. जेवणानंतर दारासमोर जागेत चटईवर वारा खात त्यांनी आराम केला होता. माझ्या बहिणीचे हातचे डोसा, इडली, ढोकळा, सुरळीच्या वड्या पदार्थ आवडीने खात आणि मला कौतुक सांगत. घरात कार्यक्रम असला तर मला त्यांच्याजवळ बसायला सांगत आणि आग्रहाने गोड पदार्थ वाढायला सांगत. मी त्यांचा लाडका होतो ना ..एकदा अनुभव घेतल्यानंतर मी मुद्दाम नंतर पंगतीत त्यांच्यापासून लांब बसत असे. तेव्हा ते मला म्हणत मला माहित आहे शेखर का लांब बसला आहे. खाण्याच्या गप्पामध्ये त्यांनी १५ बुंदीचे लाडू खाल्याबाबत आणि भरपूर श्रीखंड आणि खिरीच्या वाट्या भरून पदार्थ खाल्ले आहेत. वाटीभरून तूप खाल्ले .. असे सांगत. .. काका - आता तुमचा साजूक तुपाचा काळ राहिला नाही असे मी म्हटल्यावर ते कबूल करीत. जेवणखाण व्यवस्थित लागत असे. काकांच्या पश्चात सुना- नातं सुना यांनी चविष्ट भोजनाची प्रथा चालू ठेवली आहेच.. घाटपांडे वाड्यात स्वयंपाक रुचकर असतो.
काकांचा राग म्हणजे जमदग्नीचा अवतार असे.. एकदा मी वाड्यात येताना खालीच काका रागावल्याचे समजले.. जोरात आवाज येत होता. ..काका संतापलेले दिसतात..मी घरी जाऊन कोचावर बसलो. ते पुष्पाताईंच्यावर ओरडत होते. मी गेल्यावर "काका - आता शांत व्हा " - असे म्हणालो आणि काय जादू होई माहित नाही तेव्हा काकांचा चढलेला रागाचा पारा एकदम खाली आला आणि शांत होऊन मला मी का चिडलो याबाबत सारे कथन करीत.. विषय होता साठलेली रद्दी आणि आळसपणा.. जवळजवळ एक वर्षाची रद्दी साठली होती... अहो जाऊ द्या, रागावू नका ,शांत व्हा.. नंतर शांत झाल्यावर गप्पात चेष्टविनोद झाल्यावर ते एवढे जोरजोरात हसत त्यांच्या मोठ्या अंगदेही मुळे कोच गदागदा हलायचा आणि मी कोठे पडतो की काय असे वाटे. कोच जुना झाला होता. त्याकाळी घरातल्या ब्रँडेड फर्निचर पेक्षा ब्रँडेड माणसांना अधिक महत्व असायचे. त्यांच्या हास्यमुद्रा पाहून .. पाच मिनटापूर्वी जमदग्नीचा अवतार असणारे काका तेच का .. प्रश्न पडे
वास्तविक लग्नापूर्वी आणि लग्नानंतर माझा आवाज अजिबात मोठा नाही जेणेकरून समोरील व्यक्ती शांत होईल. पण काका आता शांत व्हा - मी फक्त एवढेच हळू आवाजात बोललो आणि जादू होऊन काका शांत होत. नंतर जाताना " शेखर तू दररोज येत जा तेवढेच काका शांत असतात असे पुषाताईं मला सांगत. दर महिन्यास रद्दी घालताना मला काकांची आठवण हमखास येतेच. आता Peace of Mind वर BK शिवानीचे ओम शांती वर व्याख्यान ऐकतो तेव्हा मला शांतीची किंमत कळते. "I am Peaceful Soul " हे ऐकल्यावर त्या प्रसंगाची आठवण होते.
मी कधी कधी प्रा. शिवाजीराव भोसले अगर इतर व्यक्ते यांच्या भाषणास गेल्यावर दुसरे दिवशी काका मला काल का आला नाहीस विचारात. तेव्हा मी भाषणाबाबत थोड्यक्यात काय सांगितले हे कथन करीत असे. जेव्हा त्यांना बरे नसे तेव्हा ते दुसरी खोलीत झोपलेले असताना मी बाहेरच्याबाहेर निघून जाई. त्यावेळेस शेखर आला असताना मला का उठवले नाही म्हणून इतरांना रागावत. मी रोज येऊन भेटून गप्पा मारून चहा घेऊन जावे असा त्यांचा मानस असे. त्यांचा चेहरा. चष्मा .. वगैरे पु.ल सारखा होता. मलापण पु. ल यांच्याबरोबर गप्पा मारतो याचा आनंद मिळे. कधी कधी मी भिडेखातर मी जाणे टाळे तेव्हा ते मला म्हणत - शेखर तुला इतकी भीड वाटत असेल तर मला चहाचे दोन रुपये देत जा. दोनापुढे कितीही पूज्य ठेवल्यातरी पूजनीय काकांचे प्रेम, जिव्हाळा याची मी किंमतच करू शकत नाही. काकांनी आपल्या हृदयातील गर्भ श्रीमंती राजवाड्यात मला जे मानाचे स्थान आणि पान दिले हे मी कधीच विसरू शकत नाही. या मानाचे ऋण माझ्या डोक्यावर घेऊनच मला आनंदात जगायचे आहे.
काय ऋणानुबंध असतात देव जाणे. आठवणी कराव्या तितक्या कमीच.. जेव्हा जेव्हा आठवणी येतात तेव्हा माझ्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू नेहमीच गर्दी करतात. ती. काकांच्याबाबत लिहावे असे बरेच दिवसापासून मनात होते. Lockdown मुळे हे शक्य झाले. त्या पहाडी कर्तृत्वान व्क्तीमत्वास मनापासून कृतज्ञतापूर्वक साष्टांग नमस्कार....
Comments
Post a Comment