ती. अप्पाजी - समाधानी आणि आनंदी व्यक्तिमत्व

 



१३ फेब्रुवारी सकाळी ८ वाजता ती. अप्पाजी याना देवाज्ञा झाली फोन आला आणि मनास वाईट वाटले. ती. आप्पाजी म्हणजे माझे सासरेबुवा आणि वर्षाचे पिताश्री.  खूप समाधानी आणि आनंदी व्यक्तिमत्व.  आमच्या नोकरीचे ठिकाण एकच - कॅनरा बँक.. माझ्या लग्नानंतर माझे सासरे आणि सासूबाई नेहमी वर्षातून एकदा  एक ते दीड महिना वर्षाकडे येत.  माझ्या प्रत्येक बदलीच्या ठिकाणी - ती. आप्पाजी आनंदाने राहत. आजूबाजू शेजारीपाजारी यांच्याशी ओळख करून ते स्वतः गप्पा मारत. राहण्याचे ठिकाण, हवामान,परिसर या बाबी जुळवून घेत. प्रत्येक गोष्टीत कमालीची adjustment  त्यामुळे त्यांना कधीही मुक्कामात कंटाळा आला असे कधीच आढळून आले नाही. कधीही कोणताच अहंभाव नव्हता. कोणी काही म्हटले तरी ते मनात कधीच ठेऊन घेत नसत. सोडून देत.

मुक्कामामध्ये बँकेत काम करीत असताना आपल्या कस्टमर, स्टाफ यांच्याबाबत गमतीजमती, प्रसंग यांचे कथन करीत. आपली जन्मभूमी - राजगोळी - या गावाविषयी अत्यंत प्रेम होते.  आपल्या नातेवाईक यांच्याबरोबर जिव्हाळयाचे नाते होते. आपल्या भाऊ आणि बहिणी यांच्या आठवणी आणि प्रसंग आठवून ते  अत्यंत भावुक होत.  औषधाची गोळी घेताना - "आधी गोळी मग पोळी आमचे गाव राजगोळी "- असे म्हणत प्रत्येक वर्षी बजेट सादर झाल्यावर बजेटबाबत वर्तमानपत्र पूर्ण वाचून माझ्याशी चर्चा करीत. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात त्यांच्या इनकम बाबत सर्व डिटेल्स एका कागदावर लिहून मला दाखवत आणि मला इनकम टॅक्स किती पडेल याबाबत खूप जागरूक असत. मी किती सेविंग करू टॅक्स वाचवण्यासाठी अशी विचारणा करीत. एक जबाबदार नागरिक या नात्याने इनकम टॅक्स बाबत त्यांचा प्रामाणिकपणा, जागरूकता आणि अभ्यास याबाबत कौतुक करावे तेवढे कमीच.

ती आप्पाजीचा व्यायाम, खानपान, चालणे, श्रोत्रपठण, नामस्मरण.. याबाबत नियमितपणा  कौतुकास्पद होता. काहीझाले तरी या महत्वाच्या गोष्टीकडे कधीच चुकारपणा अगर आळशीपणा करीत नसत.  आपल्या हृदयाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी, पथ्यपाणी, खानपान यावर संयम पाळला. अर्थात या कमी त्यांच्या पत्नी सौ. मीराताई आणि सून सौ. गायत्री यांची मदत आणि सहकार्य होतेच.

५२ वर्षाच्या संसारात त्यांना सौ.मीराताई यांची उत्तम साथ लाभली.सौ. मीराताई याना गाण्याची आवड. विश्वास आणि वर्षा या अपत्यांना पण गाणे, वादन याची आवड. एकूण कुटुंब संगीतमय.  नंतर अत्यंत सेवाभावी आणि गृहकर्तव्यदक्ष अशी सून - गायत्री लाभली.  श्रेयस आणि श्रुष्टि यासारखी गुणी आणि हुशार नातवंडे यांच्या सहवासात अप्पाजीचे  दिवस मजेत गेले.  संसारात अशी चांगली मंडळी भेटणे खरच नशीब लागते.  आपल्या वृद्धपकाळात सेवाभावी सून आणि मुलगा आपल्या जवळ असणे हे म्हणजे जणू स्वर्गसुखच ..

२१ फेब.रोजी अप्पाजी ८५ वर्षे पूर्ण आणि २५ फेब. संसाराची ५२ वर्षे पूर्ण करणार होते. पण यंदाचा वाढदिवस स्वर्गात साजरा करायचा मानस देवाचा असावा. ती. अप्पाजींचे जीवन सुखी समाधानी हसतखेळत देवभक्तीत गेले.  त्यांचे बरेच गुण मला भावले.  नियमित व्यायाम, नामस्मरण, समाधानी वृत्ती, नो इगो, लेट गो.. हे गुण आपण आचरणात आणले तर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल नाही का ...?

प्रत्येक वेळा बेंगलोर प्रवासात मला वर्षा/श्रेयस यांची साथ असे यावेळेस ती. अप्पाजींच्या  सुंदर आठवणी यांची साथ होती आणि बेंगलोर कधी आले कळले नाही. आठवणी काढाव्यात तितक्या कमीच. माझ्याकडून बोलण्यात, वागण्यात काही कमीजास्त झाले असेल अगर कन्येच्या सुखाच्या अपेक्षा यामध्ये मी कमी पडलो असेल तर माफी ..क्षमस्व...ओम शांती.. श्री राम जय राम जय जय राम....



Comments

Popular posts from this blog

कर्नल्स क्यूब - "शारीरिक व मानसिक स्वास्थ - योग साधनेद्वारा"

विराट हिंदू संमेलन - श्री शरद पोंक्षे

सायोनारा - जपान दौरा